मग बघूया
✍️आयुष्यात असे काही क्षण असतात...हे करू की नको आणि अशावेळी आपण एक शब्द नेहमी वापरतो की 'मग बघूया....' आणि ज्यावेळी आयुष्याच्या शेवटच्या क्षणाला आपण ज्यावेळी आयुष्याचा चलचित्रपट चालवतो त्यावेळी गोळाबेरीज करताना अशा कितीतरी गोष्टी असतात की त्या बाकी मध्ये राहिलेल्या असतात..
नक्कीच मी काय...आपण काय ही बाकी शून्य करू शकत नाही.पण कमी तरी नक्कीच करू शकतो. बस्स..काय लागते... काहीतरी करण्याची इच्छा, प्रत्येक गोष्टीत आनंद शोधण्याची कला,जे काय चांगले आणि विलक्षण आहे त्या उदात्त गोष्टीवर मनापासून प्रेम करण्याची शक्ती...पण मग हा शब्द आपल्या आयुष्यात एवढा मोठा बदल घडवतो की आपले आयुष्यच एक adjustment करून टाकतो..
आयुष्यात पाहिजे असणारी एखादी गोष्ट पुढे ढकलायची असेल तर आपण नक्की वापरणारा शब्द म्हणजे... 'मग बघूया...' अगदी तारूण्यापासून म्हणजे आपण शाळेत असल्यापासून 'मग बघूया' या शब्दामुळे सूतपुत्र कर्णासारखं बाजूला पडतो.. कित्येक वेळा मनाला आवरून जगावं लागते.त्यावेळी नोकरी लागू दे 'मग बघूया', नोकरी लागल्यानंतर... लग्न होऊ दे 'मग बघूया',घर बांधून 'मग बघूया',मुले होऊ द्यात 'मग बघूया'..मुलांचे शिक्षण होऊ देत 'मग बघूया', मग बघूया म्हणत म्हणत काळाची एवढीशी खार हळूहळू एक एक लाकूड स्मशानात नेऊन कधी सरण रचते कळतसुद्धा नाही.*मग कळते अरेच्या जगायचं राहूनच गेलं की...
मग आपल्या कल्पनेतील आनंद कल्पनेतच राहतो आणि नशीबाने मिळालेल्या माणसाचा जन्म आपण आयुष्यातील आलेल्या परीक्षा सोडवण्यात घालवतो.. एक पेपर सोडवला की दुसरा पेपर तयार आणि धावत्या जगात जो मनातील आनंद घ्यायचा ठरवलेला असतो..ज्या म नात इमारती बांधलेल्या असतात त्या ढासळून जातात.. जिवंत असेपर्यंतच आनंद घ्यायला हवा. नाहीतर राखेवर ठेवली जाणारी शेव आणि भज्जी फक्त काकस्पर्श ठरतील... सुखस्पर्श नाही..सुंदर आयुष्य जगायला फक्त पैशाची नव्हे तर गरज आहे सुंदर विचार करण्याची..नाही तर हे आयुष्य असेच निघून जाईल...हे म्हणत की बाद में देखेंगे म्हणजेच मग बघूया....
श्री.किरण दिपक सुतार,केंद्रशाळा चव्हाणवाडी, ता.पन्हाळा,जि.कोल्हापूर
